लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रुग्ण उशिरा दाखल होत असल्याने अगदी कमी कालवधीत या रुग्णांचा मृत्यू होत असून उपचारांना होणारा उशीर जीवावर बेतत असल्याची गंभीर स्थिती या दुसऱ्या लाटेत समोर आली आहे. अनेकांना तर आपत्कालीन कक्षात दाखल केल्यानंतर काही कालावधीतच त्यांचा मृत्यू झाला आहे. एकत्रित चित्र बघता २४ तासाच्या आत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९० मृत्यू झाले आहेत.
जिल्ह्यात आता पुरेसे बेड उपलब्ध आहेत. मात्र, मार्च महिना आणि एप्रिलच्या दोन आठवड्यापर्यंत अगदी बिकट परिस्थिती होती. बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेतच फिरावे लागत होते. यातच उशीर होऊन त्यांचा मृत्यू होत होता. अनेकांना व्हेंटीलेटर मिळत नव्हते. खासगी व शासकीय यंत्रणेत बेडसाठी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही बेड उपलब्ध होत आहेत.
व्हेंटिलेटरची संख्या वाढली
जीएमसीत नुकतेच पीएम केअर फंडकडून ५० व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता हव्या त्या ठिकाणी व्हेंटिलेटर लावण्यात येत आहेत. ज्या कक्षात रुग्ण दाखल आहेत त्या कक्षात गरज पडल्यास व्हेंटिलेटर हलविले जात आहे.
एप्रिल महिन्यात झालेले एकूण मृत्यू : ५५९
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेले मृत्यू : २०१
एकूण ब्रॉड डेड १९
सहा तासाच्या आत मृत्यू ४३
६ ते २४ तासाच्या आत मृत्यू ९०
कोण कारणीभूत
ग्रामीण रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर आहेत, मात्र, ते पुरसे नाहीत, त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्यास त्यांना थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवावे लागते. अशा स्थितीत चाळीसगाव, मुक्ताईनगर, रावेर सारख्या तालुक्यांमधून रुग्ण यायला उशीर होतो.
रुग्णच अंगावर काढत असल्याने अगदी ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतरच रुग्णालयात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मार्च महिन्यात काही मृत्यू हे वेळेवर उपचार न मिळाल्याने झाले आहेत. यात बेड फूल असणे, व्हेंटिलेटर कुठेच न मिळणे यामुळे ही स्थिती उद्भवली होती.
एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाही ही स्थिती कायम होती. त्यामुळेही रुग्णालयात दाखल करताच काही तासांनी रुग्णाचा मृत्यू होत होता. हे प्रमाण आता कमी झाले आहे.
आपत्कालीन कक्षात लावले जाते व्हेंटिलेटर
गंभीरावस्थेत दाखल रुग्णाला आपत्कालीन कक्षात असलेल्या बेडवरच व्हेंटिलेटर लावण्यात येते. केवळ आयसीयूमध्ये नाही तर ज्या कक्षात आवश्यकता असेल त्या कक्षात आता व्हेंटिलेटर लावले जाते. मुळात बाहेरूनच रुग्ण उशिरा रुग्णालयात येत असल्याने त्यांचा काही तासांच्या आत मृत्यू होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.