लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरातील कोरोना चाचण्यांमध्ये तब्बल ८० टक्क्यांनी घट झाल्याचे गंभीर चित्र आहे. मंगळवारी केवळ ४४७ ॲन्टिजन चाचण्या झाल्या असून, एकत्रित ५३९ चाचण्या झाल्या आहेत. चार हजारांवर होणाऱ्या चाचण्या पाचशेवर आल्याने नेमके हे प्रमाण घटले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंगळवारी २८ नवे बाधित आढळून आले तर ६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून चाचण्या कमी होत असल्याचे चित्र आहे. मंगळवारची परिस्थिती बघता ॲन्टिजन ४४७ तर आरटीपीसीआरचे ८३ अहवाल समोर आले. तर आरटीपीसीआरसाठी ९८ नमुने संकलीत करण्यात आले. शिक्षकांच्या चाचण्या थांबल्यानंतर आरटीपीसीआरचे प्रमाण घटले आहे. यातही जळगाव शहरातीलच तपासण्या अधिक असून, जिल्ह्यातील अन्य ठिकाणाहून चाचण्या अगदीच कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.
तीनच तालुक्यात रुग्ण
मंगळवारी जिल्ह्यातील जळगाव शहरात १०, भुसावळात १४ तर यावल १ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे रुग्ण आढळून आले असून, जळगाव ग्रामीण आणि १२ तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. जळगाव शहरातील योगेश्वर नगर २ आणि रामेश्वर कॉलनी २ असे रुग्ण आढळून आले आहेत.