लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भंडारा येथे धक्कादायक घटनेनंतर आता आरोग्य विभाग खडबडून जागा झाले असून रुग्णालय, आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७७ आरोग्य केंद्राचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी आता
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी यंत्रणांना पत्र दिले आहे.
जिल्ह्यात असलेल्या या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची तपासणी केली जाते. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतही ही आरोग्य केंद्र महत्त्वाचा कणा
मानली जातात. अशा स्थितीत या ठिकाणची सुरक्षा महत्त्वाची ठरते. मात्र, आतापर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने या आरोग्य केंद्रांचे कुठलेही
ऑडिटच झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. विद्युत पुरवठ्याबाबत कुठे काही अडचणी आल्यास तेवढी तपासून दुरुस्ती केली जात
होती. या ठिकाणी ऑडिट करण्याची आवश्यकता नसल्याचाही सूर उमटला आहे. हवी तेवढी तपासणी नियमित होत असल्याचे काही
डॉक्टरांनी सांगितले. जिल्ह्यात नव्यात सात आरोग्य केंद्रांचे बांधकामही सुरू असल्याची माहिती आहे.
कोट
ऑडिटसंदर्भातील प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. यात तपासणी करून कुठे काय कमतरता आहे. बांधकामात काही अडचणी आहेत का,
विद्युत पुरवठा कसा आहे. यानंतर ई-टेंडरिंगनुसार याची कामे केली जातील. आम्ही संबंधित यंत्रणेला कळविले आहे. याला साधारण पंधरा
दिवसांचा अवधी लागू शकतो.
- डॉ. बी. टी. जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी