धुळे : शिरपूर मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर एसटी बसेसला ५0 टक्के सवलत मिळविण्यात विभाग नियंत्रकांना यश आले आहे. राज्यस्तरावर हा लाभ मिळावा म्हणून वरिष्ठ स्तरावरूनही चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहा वर्षांपासून महामंडळ तोट्यात आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. यात टोल नाक्यांवरही एसटी बसला सवलत मिळावी म्हणून राज्यपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विभाग नियंत्रकांनी जिल्ह्यातील धुळे - शिरपूर टोल नाका प्राधिकरणाशी चर्चा केली आणि त्यात एका बसला ५0 टक्के सवलत मिळवून घेण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक बसेस रोज धुळे-शिरपूर महामार्गावर धावतात. त्यामुळे या महामार्गावर असलेल्या दोन टोल नाक्यांवर बससाठी मोठय़ा प्रमाणात टोल भरावा लागत होता. त्यात सवलतीसाठी प्रयत्न सुरू होते. शिरपूर शहरानजीक असलेल्या आढे येथील टोल नाका प्राधिकरणाने चर्चेअंती बसला ५0 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे महामंडळाला रोज १६ हजार रुपयांच्या बचतीचा फायदा होत आहे. धुळे - शिरपूर महामार्गावरून रोज १४0 बसेसच्या फेर्या होतात. भविष्यात राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर बसेसला टोलमध्ये सवलत मिळवून देण्यासाठी टोल प्राधिकरण व एसटी परिवहन महामंडळात राज्यपातळीवर चर्चा सुरू आहे. विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांची अन्य सर्व टोल नाक्यांच्या मुख्य अधिकार्याशी चर्चा सुरू आहे.
शिरपूर 'टोल'वर ५0 टक्के सवलत
By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST