खबरदारी : ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याबाबत विभाग प्रमुख निर्णय घेणार
जळगाव :कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने जिल्हा परिषदेत १ एप्रिल पासून सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती करण्यात येणार असल्याची माहिती,जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ कमलाकर रणदिवे यांनी सांगितले.तसेच ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याबाबत त्या-त्या विभागांच्या प्रमुखांवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचेही रणदिवे यांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ापासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषदेतही अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारीही सिंचन विभाग व पाणी पुरवठा विभागात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित कर्मचारी आढळून येत असल्याने, जिल्हा परिषद प्रशासनाने १एप्रिल पासून कार्यालयात ५० टक्के कर्मचारी बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना काही शारीरिक व्याधी आहेत,त्यांना घरून काम करण्याचे सांगण्यात येणार आहे.
दरम्यान, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून, कर्मचारी व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी फक्त एकच मार्ग सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे तापमान मोजूनच इमारतीमध्ये सोडण्यात येत आहे.