जळगाव : नारळाच्या रोपांच्या खाली झाकून भुसावळकडून जळगाव शहरात येत असलेल्या ४६ लाख रुपये किमतीचा गांजाच्या ट्रकची कारने पायलेटिंग करीत असलेल्या आशिक सुलेमान मौले उर्फ पटेल (२७,रा.समृद्धीनगर, मेहरूण) याला एमआयडीसी पोलिसांनी पकडले. न्यायालयाने त्याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आशिक हा पाच महिन्यांपासून फरार होता. त्याच्यासोबतचे आणखी दोन जण फरार आहेत.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी २५ ऑगस्ट रोजी खेडीनजीक भुसावळकडून जळगावकडे ट्रकमधून येणारा ४६ लाख २० हजार ४९० रुपये किमतीचा ६३६ किलो गांजाचा ट्रक पकडला होता. त्यावेळी चालक मुक्तार अब्दुल रहीम पटेल (२४,रा.लोहारा, ता.बाळापूर, जि.अकोला याला अटक करण्यात आली होती. याचवेळी आशिक मौले, अरमान चिंधा पटेल (रा.मेहरूण) व शेख आसिक शेख मुनाफ (रा.तांबापुरा) हे तिघं जण कारने (क्र.एमएच-१८ एजे २५०७) पर्यंत पुढे पायलेटिंग करीत होते. ट्रक पकडण्यात आला तेव्हा ही कार देखील थांबली होती, पोलिसांना पाहून तिघं जण तेथून फरार झाले होते. तेव्हापासून तिघं जण फरार असतानाच आशिक मौले हा शिरपूर येथे असल्याची माहिती तपासाधिकारी प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर व चंद्रकांत पाटील यांचे पथक रवाना केले. सोमवारी सकाळी त्याला जळगावात आणण्यात आले. तपासाधिकारी शिकारे यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.