१२ जून रोजी कासार हे त्यांच्या कुटुंबासह घरात झोपले होते. त्यांनी घराला कडी-कोयंडा लावलेला नव्हता. चोरट्यांनी कासार यांच्या घरात प्रवेश करुन कपाटातून सात हजार रुपये रोख ३० हजार रुपयांचे दागिने व साडेसात हजार रुपयांचे दोन मोबाईल असा ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पहाटे साडेतीन वाजता कासार यांना जाग आली असता साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी गुंगीचे औषध तोंडावर फवारल्यामुळेच चोरी झाल्याचे ठाम मत कासार यांनी व्यक्त केले. हवालदार विजय पाटील तपास करीत आहेत.
गंधर्व कॉलनीत प्रौढाला दमदाटी
जळगाव : घरासमोर शौचालयाचे पाईप टाकण्याच्या कारणावरुन वाद होऊन दिनेश रामदास पाटील (वय ४९) यांना चिन्मय श्रीकृष्ण राणे व यशवंत भिवसन पाटील यांनी शिवीगाळ करुन दमदाटी केल्याची घटना रविवारी सायंकाळी गंधर्व कॉलनीत घडली. याप्रकरणी दोघांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
वडलीत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
जळगाव : ‘फादर्स डे’ चे निमित्त साधून रविवारी सायंकाळी वडली, ता.जळगाव येथे ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपशिक्षक नारायण उंबरे यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी सरपंच युवराज भिकाजी गायकवाड, उपसरपंच मोनिका पाटील, वसंत पाटील, रामचंद्र पाटील, संभाजी पाटील, गजानन पाटील, सविता पाटील, मुनील पाटील, जगन्नाथ पाटील, समाधान पाटील, बाबुलाल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.