लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावे, शिक्षणात सातत्य टिकून राहावे यासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. यंदा मनपा शिक्षण मंडळाच्या समग्र शिक्षा अभियान विभागातर्फे ४३ दिव्यांग विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्याचा लाभ देण्यात आला आहे.
दिव्यांग मुली शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांची पटसंख्या वाढावी तसेच शाळेतील विद्यार्थिनींची संख्या टिकून राहावी, यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता दिला जात असतो. त्यात दहा महिन्यांसाठी दाेन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दिव्यांग विद्यार्थिनींकडून या योजनेच्या लाभासाठी शाळांकडून मनपा शिक्षण मंडळाच्या समग्र शिक्षा अभियान विभागाने प्रस्ताव मागविले होते.
४३ प्रस्ताव प्राप्त
प्रोत्साहन भत्त्यासाठी मनपा शिक्षण मंडळाला ४३ विद्यार्थिनींचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामध्ये ३१ प्राथमिक, तर १२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींचा समावेश होता. दरम्यान, हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी केवळ तीनच महिने शाळा सुरू होती. त्यामुळे तीनच महिन्यांचा भत्ता शासनाकडून मंजूर करण्यात आला. तीन महिन्यांची प्रत्येकी सहाशे रुपये रक्कम विद्यार्थिनींना मंजूर करण्यात आली.
धनादेशाद्वारे वाटप
दरम्यान, लाभार्थी विद्यार्थिनींच्या भत्त्याची रक्कम ही काही दिवसांपूर्वी मनपा शिक्षण मंडळाला प्राप्त झाली होती. ती रक्कम शाळांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. तसेच शाळांनीसुद्धा धनादेशद्वारे प्रोत्साहनपर भत्त्याची रक्कम ४३ दिव्यांग विद्यार्थिनींना वाटप केली आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मदतनीस भत्ता व प्रवासभत्तासुद्धा दिला जातो. या दोन्ही योजनांतर्गंत दहा महिन्यांसाठी सहा हजार रुपयांचा भत्ता लाभार्थींना दिला जातो.