बोदवड, जि. जळगाव : मुलांना सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून सटाणा येथील बिल्डरची ४० लाखांत फसवणूक करणाऱ्या बोदवड येथील तीन जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
तरुण पवन (राजे) पुरुषोत्तम पाटील, अक्षय पाटील (रा. मनूर ता. बोदवड) आणि कारमालक समाधान कोळी (रा. बोदवड) अशी अटक केलेल्या तीन जणांची नावे आहेत. त्यांना बुधवारी सायंकाळी नाशिक पोलिसांनी अटक केली. या फसवणूक प्रकरणात अन्य तीन जणांवर सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. अशोक हजारीमल थोळे (जैन), रा. सटाणा हे बिल्डिंग प्लॅन आणि डिझायनिंगचा व्यवसाय करतात. त्यांची दोन्ही मुले दर्शन व अंकित यांचे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्याकडे १९ मे २०१८ रोजी राजेंद्र नथमल बुरड हा आले व आपल्या परिचयातील एकाची मंत्रालयात ओळख आहे. तो दोन्ही मुलांना नोकरी लावून देईल, अशी बतावणी केली. यानंतर बुरड याने जैन यांची पवन व अक्षय पाटील यांच्याशी ओळख करून दिली. यानंतर दोन्ही मुलांना नोकरी लागेल, या आशेवर जैन यांनी पवन व अक्षय याच्याकडे प्रत्येकी २० लाख रुपये दिले. काम न झाल्यास पैसे परत मिळतील, असे आश्वासनही दिले; परंतु कामही झाले नाही आणि पैसेही परत मिळाले नसल्याने वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन व अक्षय यांना कारमालक समाधान कोळी मदत करीत होता. त्याच्याविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.