लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात रविवारी कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळून आले असून ६ रुग्ण बरेदेखील झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक घटले आहे. हे दिलासादायक चित्र कायम असून मृत्यू थांबले आहेत. शिवाय जळगाव शहरासह १२ तालुक्यांमध्ये रविवारी एकही बाधित समोर आलेला नाही. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ही ४ वर आलेली आहे.
जिल्ह्यात रविवारी आरटीपीसीआरच्या १९६२ अहवालांमध्ये ३ बाधित आढळून आले आहेत. तर ॲन्टीजनच्या १०७७ तपासणीत १ बाधित आढळून आला आहे. जिल्ह्यात १६ जुलैपासून रुग्णसंख्या ही नियमित १० पेक्षा खालीच नोंदविण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी ही एक टक्क्याच्या खालीच स्थिर आहे. जळगाव शहरातही गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचे दिलासादायक वातावरण आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी झालेली आहे. कोविड केअर सेंटर बंदच असून आता गृहविलगीकरणातच अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. केवळ ९ रुग्णांना लक्षणे आहेत.
मृत्यूदर घटला
गेल्या अनेक महिन्यांपासून १.८१ टक्क्यांवर स्थिर असलेला मृत्युदर अखेर मृत्यू घटल्याने कमी झाला आहे. रविवारी मृत्युदर १.८० टक्के नोंदविण्यात आला आहे. तर रिकव्हरी रेट हा ९८.१८ टक्के नोंदविण्यात आला आहे. दोन्ही लाटांमध्ये रिकव्हरी रेट हा प्रथमच ९८ टक्क्यांपेक्षा अधिक नोंदविला गेला आहे.
अशी आहे रुग्णसंख्या
सक्रिय रुग्ण २६
गृहविलगीकरणात १७
रुग्णालयात उपचार घेणारे ९
ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारे रुग्ण २
अतिदक्षता विभागातील रुग्ण ३