लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यभरात प्लॅस्टिक विक्रीस बंदी असतानाही शहरातील बाजारपेठेत प्लॅस्टिकचा सर्रासपणे वापर होत आहे. मनपा आरोग्य विभागाच्या पथकाकडून सोमवारी पोलनपेठ भागातील शिव प्लास्ट अँड पॅकेजिंग या दुकानावर कारवाई केली आहे. याठिकाणी तब्बल ३ ट्रॅक्टर माल जप्त करण्यात आला आहे. तसेच मनपाने हे दुकानदेखील सील केले असून, दुकानदारावर २५ हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील अनेक दुकानांमध्ये प्लॅस्टिकचा सर्रासपणे वापर होत आहे. मनपाकडून देखील कारवाई ही एखाद महिन्यात केली जात असते. सोमवारी मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे पोलनपेठ भागातील एका दुकानात प्लॅस्टिकचा मोठा साठा असल्याची तक्रार मिळाल्यानंतर मनपाच्या पथकाने सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक धाड टाकत याठिकाणचा प्लॅस्टिकचा साठा जमा केला आहे. मनपाकडून आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.पी.अत्तरदे, एल.पी.धांडे, यू.आर. इंगळे, संजय बागुल, सुरेश भालेराव यांच्यासह पथकाने कारवाई केली. दरम्यान, मनपाकडून याआधी मनपा प्रशासनाकडून शहरातील अनेक दुकानांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र, जप्त माल कोठे टाकला जातो याबाबत देखील मनपाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. मनपाच्या कारवाईनंतर जप्त मालाचे नेमके काय केले जाते? याबाबत अनेक नगरसेवक व माजी नगरसेवकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.