जळगाव : रिक्त पदांमुळे कामावर होणारा परिणाम लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला पोलीस शिपाई व पोलीस नाईक अशा २१८ जणांना पदोन्नती देऊन रिक्त पदांचा भार हलका केला. आषाढीलाच अचानक पदोन्नतीची ऑर्डर हातात पडल्याने जणू आपल्याला पांडुरंग पावल्याची भावना या अमलदारांनी व्यक्त केली.
जिल्हा पोलीस दलात दर महिन्याला निवृत्त होणाऱ्यांची संख्या व आरक्षण तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका याला अधीन राहून पदोन्नतीसाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्वत:च्या अधिकारात एक समिती गठीत केली. त्यात अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी उपअधीक्षक डी.एम.पाटील, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, आस्थापना लिपिक दीपक जाधव व सुनील निकम यांचा त्यात समावेश होता. या समितीने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेला अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात नाईक ते हवालदार ९८ व शिपाई ते नाईक १२० अशा २१८ जणांना पदोन्नती दिली.
१११ पदांसाठी होणार भरती
जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर २०१९ या वर्षाची प्रलंबित भरती डिसेंबर महिन्यात होणार असून त्यासाठी १११ जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. ज्या उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या कमी आहे त्यांना इडब्लूएसच्या १० टक्के आरक्षण मिळणार आहे. त्याशिवाय मराठा आरक्षणातील ईसीबीसीचे उमेदवार खुल्या प्रवर्गात भरती होणार आहेत. २०२० व २०२१ ची भरती अजून तरी शासनाने जाहीर केलेली नाही. दरम्यान, सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली पदे, आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणारे तसेच पदोन्नती यात मेळ घालण्यात आला असून त्यातून रिक्त झालेल्या १११ पदांची भरती होणार आहे.
कोट...
पदोन्नती हा प्रत्येकाचा हक्क आहे. वेळेत ही कार्यवाही झाली तर अमलदाराला त्याचा आर्थिक व इतर लाभ मिळू शकतात. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पात्र ठरलेल्या अमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्याशिवाय २०१९ च्या रिक्त पदानुसार जिल्ह्यात १११ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यावेळी प्रथमच लेखी परीक्षा घेऊन नंतर पुढची प्रक्रिया केली जाणार आहे.
-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक