जळगाव : पेट्रोल- डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने, खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकानींही प्रवासी भाड्यात २० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे महामंडळाच्या बस आणि खाजगी प्रवासी गाड्यांचेही भाडे समान आले आहे. मात्र, वाढलेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांना आता बसचा आणि खाजगी वाहनाचांही प्रवास परवडेनासा झाला आहे.
एसटी महामंडळाच्या बसेस प्रमाणे जिल्हाभरात प्रत्येक मार्गावर खाजगी प्रवासी वाहने मोठ्या संख्येने धावतांना दिसून येत आहे. प्रत्येक गावांना जाण्यासाठी तात्काळ वाहने मिळत असल्यामुळे, प्रवाशांचींही गैरसोय दुर झाली आहे. विशेष म्हणजे महामंडळाच्या बसच्या भाड्यापेक्षा खाजगी प्रवासी वाहनांना १० ते १५ रूपयांपर्यंत भाडे कमी लागत असल्यामुळे, ग्रामीण भागातील बहुतांश प्रवासी खाजगी वाहनांच्या प्रवासालाच पसंती देत होते. प्रवाशांच्या या प्रतिसादामुळे जिल्ह्याभरात आज खाजगी प्रवासी वाहनांची संख्या हजारोंच्या घरात पोहचली आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे खाजगी वाहनधारकांनींही गेल्या महिन्यापासून २० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. दरम्यान, पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्यामुळे आम्हालाही व्यवसाय करणे अवघड झाले आहे, त्यामुळे काही प्रमाणात भाडेवाढ करावी लागली असल्याचे वाहनधारकांनी सांगितले.
इन्फो :
असे वाढले पेट्रोल- डिझेलचे दर (प्रती लीटर)
पेट्रोल डिझेल
जानेवारी २०१९ ७५. ३० ६५. ५१
जानेवारी २०२० ८१.७१ ७१. ०९
जानेवारी २०२१ ९१. ५८ ८०. ५१
ऑगस्ट २०२१ १०७. ७० ९५. ८६
इन्फो :
प्रवासी वाहनांचे दर
वाहनाचा प्रकार दर
चार सीटर वाहन : ११ रूपये
नऊ सीटर वाहन : १४ रूपये
मिनी बस : २० रूपये
ट्रॅव्हल्स : ४८ रूपये(प्रति. किमी)
इन्फो :
गाडीचा हफ्ता कसा भरणार :
गेल्या वर्षी कोरोनाकाळात मी दोन प्रवासी वाहने हफ्त्याने घेतली आहेत. ही दोन्ही वाहने शाळेला विद्यार्थी सोडण्यासाठी भाड्याने लावली होती. मात्र, शाळा बंद असल्यामुळे या वाहनांचे हफ्ते फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिलीप वाघ, वाहन मालक
कोरोनानंतर आता प्रवासी वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. मात्र, प्रवाशांचा अद्यापही प्रतिसाद नाही. त्यामुळे दर महिन्याला गाडीचे हफ्ते फेडण्यासाठींही पुरेसे उत्पन्न येत नाही. त्यात डिझेलचे दर वाढल्यामुळे अधिकच अडचणींचा सामना करावा लागत असून, दर महिन्याला गाडीचा हफ्ता फेडतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सुनील शिंदे, वाहन मालक