गत आठवड्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी मित्रपरिवार व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने एमजी नगरातील तेली समाज मंगल कार्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेतले. या शिबिरात एकाच दिवशी विक्रमी दोन हजार नागरिकांचे लसीकरण केले गेले. बुधवारीदेखील येथे लसीकरण झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
माजी आमदार राजीव देशमुख यांनीही येथील राजपूत लोकमंगल कार्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. येथेही मोठ्या संख्येने नागरिकांनी लस घेतली. १८३० नागरिकांचे लसीकरण केले गेले. शिबिराला राजीव देशमुख यांच्यासह जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकूर, दीपक पाटील, जगदीश ठाकूर, भूषण पवार यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. खासदार उन्मेष पाटील यांनीही वैभव मंगल कार्यालयात लसीकरण शिबिर राबविले.
आजही दहा नागरिक होतील ‘लसवंत’
आरोग्य विभागाने सामाजिक व राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू केले आहे. याअगोदरही सहा हजार नागरिकांचे लसीकरण एकाच दिवशी केले गेले. बुधवारीही १८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. गुरुवारीदेखील १० हजार नागरिकांचे लसीकरण होणार आहे.