जळगाव : किसान क्रेडिट कार्डचा हप्ता थकला असल्याचे सांगून म्हसावद येथील शेतकरी निंबा दशरथ ठाकरे (६८) यांना एका अज्ञात व्यक्तीने १ लाख ६७ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. हा प्रकार गुरुवारी समोर आला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी निंबा ठाकरे हे म्हसावद येथील रहिवासी आहेत. २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ते घरी झोपलेले असताना त्यांना एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला. तुमच्या किसान क्रेडिट कार्डचा हप्ता थकला असून आपल्या बँक खात्यात रक्कम असून, त्यातून थकीत रक्कम वर्ग केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यावर ठाकरे यांनी आम्ही रक्कम भरलेली असल्याचे सांगितले. मात्र, हप्ता थकल्याचे सांगून त्या व्यक्तीने ठाकरे यांच्याकडून बँक खात्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. नंतर ओटीपी क्रमांक मिळवित निंबा ठाकरे यांच्या बँक खात्यातून सुमारे १ लाख ६७ हजार ८०९ रुपये ऑनलाइन काढून घेतले. दरम्यान, दोन दिवसांनंतर त्यांना खात्यातून रक्कम कुणी तरी काढल्याचे समजले. अखेर त्यांनी २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसीत धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहेत.