वरूड (बु.) : जन्मदात्या आई-वडिलांची उतारवयात अवहेलना न करता काचेच्या भांड्याप्रमाणे जीव लावून त्यांची सेवा करावी. जीवनात कुणासमोर कितीही संकटे आली तरी पदर पसरविण्याची वेळ तुमच्यावर भगवान परमात्मा कधीच येऊ देणार नसल्याचे हभप विष्णू महाराज सास्ते यांनी सांगितले.
भोकरदन तालुक्यातील वरूड (बु.) येथे गणेशोत्सवानिमित्त बुधवारी आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. आज विश्वास कुणावर ठेवावा, हा मोठा प्रश्न आहे. कारण, जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्यामागचे चेहरे ओळखणे होय. दुसऱ्याचा मोठेपणा व त्यांची प्रसिद्धी ही आपल्यातीलच काही लोकांना खुपते. त्यामुळे समाजातील लोकांची दशा व हाल होत आहे. संपत्तीचा दाखला देत असताना विष्णू महाराज म्हणाले, आज या विश्वात संपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे. परंतु, जगण्या-मरण्याचा हिशेब भगवंताकडे आहे. त्यासाठी आपण कितीही संपत्ती कमवली तरी ती काहीच कामाची नाही. कारण, रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जावे लागणार आहे. यासाठी माणूस म्हणून जगा असेही ते म्हणाले.
चौकट
आजच्या युगातील चित्र बदलत चालले आहे. योग्य संस्कारांअभावी भावी पिढीची घडी कुठेतरी विस्कटत चालली आहे. समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाणदेखील वाढले आहे. यासाठी प्रत्येक आई-वडिलांनीदेखील आपल्या मुलांना लहान वयातच योग्य संस्कारात घडविणे गरजेचे आहे. तुमचा मुलगा मोठा साहेब नाही बनवता आला, तरी चालेल मात्र चांगला माणूस नक्कीच बनवा, असे आवाहनही सास्ते महाराज यांनी केले.