जालना-देऊळगावराजा रस्त्यावरील घटना
जालना : पाठीमागून आलेल्या कारने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार २२ वर्षीय तरुण ठार झाला. ही घटना जालना-देऊळगावराजा रस्त्यावरील महिको कंपनीजवळ घडली आहे. दीपक दत्तात्रय वाडेकर (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे.
जामवाडी येथील रहिवासी असलेल्या दीपक वाडेकर याचे नवीन मोंढा येथे हार्डवेअरचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करून दुचाकी (एमएच २१ बीजे ५०१८) ने तो गावकडे जात होता. महिको कंपनीजवळ पाठीमागून येणाऱ्या कार (एमएच २१ व्ही. ७८५०) ने जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. या अपघातात दीपकच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. घटना घडताच कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. गुरुवारी सकाळी ही कार एका गॅरेजमधून पकडण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, असा परिवार आहे.