भोकरदन : सरकारी नोकरी करताना प्रत्येक अधिकाऱ्यांना गाडीचा चालक तसेच कार्यालयात असलेला सेवक प्रामाणिक लाभणे आवश्यक आहे. त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे, नाही तर काम करताना अडचणी निर्माण होतील. गाडीचा चालक हा निर्व्यसनी असावा. कर्तव्य बजावत असताना प्रामाणिक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी केले.
भोकरदन येथील पंचायत समिती कार्यालयातील चालक अच्युत बुजुळे व सभापती कक्षाचे सेवक रामेश्वर भोंडे, ग्रामसेवक सुदाम कोरडे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती विनोद गावंडे हे होते. मान्यवरांच्या हस्ते अच्युत बुजुळे, रामेश्वर भोंडे, ग्रामसेवक सुदाम कोरडे यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना राजपूत म्हणाले की, शिपाई व गाडी चालकांनाच अधिकाऱ्यांचे सुख- दु:ख माहिती असते. कार्यालयाची काळजी त्यांनाच असते, असेही ते म्हणाले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.