फोटो
पारध : दळणवळणाचा मुख्य स्रोत म्हणून रस्त्याकडे बघितले जाते. असे असतानाही भोकरदन तालुक्यातील पारध ते वालसावंगी या सात किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले होते. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागाने शुक्रवारपासून रस्त्याचे काम सुरू केले आहे.
पारध ते वालसावंगी फाटा हा रस्ता खान्देश व विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे, तसेच वालसावंगी, धामणगाव, पिंपळगाव रेणुकाई, धाड, चिखली, माहोरा येथील व्यापारी खरेदी-विक्रीसाठी याच रस्त्याने ये-जा करतात. यामुळे रस्त्यावर मोठी वर्दळ असते, परंतु रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. असे असतानाही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. तालुक्यातील बहुतांश रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे, परंतु पारध ते वालसावंगी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत होते. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचतात. यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना घडल्या होत्या.
ग्रामस्थांकडून समाधान
राज्यात प्रसिद्ध असलेल्या जाळीच्या देवाच्या दर्शनासाठी मराठवाड्यातील भाविकांना हाच मार्ग सोपा आहे. त्यामुळे बहुतांश जण याच मार्गाने ये-जा करतात, परंतु रस्ता खराब झाल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.
—————-