बदनापूर/ सेलगाव (जि. जालना) : तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात सोमवारी सकाळी रेल्वेतून खाली पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी महिलेला उपचारासाठी नेताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. प्रारंभी अर्धा किलोमीटर झोळीतून व नंतर बैलगाडीतून महामार्गापर्यंत नेण्यात आले. तेथून त्या महिलेला उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सतविंदर कौर कुलजितसिंग बिंद्रा (७० रा. पद्मपुरा बन्सीलाल नगर, औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडीजवळील भोर्डी नदीपासून औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर सोमवारी सकाळी एक महिला जखमी अवस्थेत पडल्याची माहिती सेलगावचे सरपंच सहदेव अंभोरे यांना मिळाली होती. त्यानंतर अंभोरे व त्यांचे सहकारी शेख बाबा, शिवाजी गाडेकर, गणेश चाळगे, बालाजी कान्हुले, ज्ञानेश्वर जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनास्थळापासून जालना-औरंगाबाद महामार्गापर्यंत जखमीला आणण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे त्यांनी त्या जखमी महिलेला सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत एका कपड्याच्या झोळीत आणले. त्यानंतर जनार्धन कान्हुले यांच्या शेतात आल्यावर तेथून बैलगाडीतून जालना-औरंगाबाद महामार्गावर नेले. महामार्गावरून शेलगाव आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून त्या महिलेला जालना शासकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठविले. मात्र, उपचार सुरू असताना त्या महिलेचा मृत्यू झाला.
सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ
घटनेनंतर त्या महिलेची ओळख पटविण्यासाठी या भागातील नागरिकांनी त्या महिलेचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. त्यानंतर त्या महिलेच्या औरंगाबाद येथील नातेवाईकांनी व्हिडिओ पाहून बदनापूर पोलीस ठाणे गाठले. त्या जखमी महिलेचे नाव सतविंदर कौर कुलजितसिंग बिंद्रा (७० रा. पद्मपुरा बन्सीलाल नगर, औरंगाबाद) असल्याचे सांगितले. बदनापूर ठाण्यातून नातेवाईकांनी जालना येथील रुग्णालय गाठले.
फोटो कॅप्शन : मात्रेवाडी शिवारातून जखमी महिलेला झोळीतून रुग्णालयाकडे नेताना नागरिक.