जालना : जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या घटली असली तरी कोरोनाची भीती आणखी कमी झालेली नाही. असे असतानाही प्रशासनाकडून होम क्वारंटाईन असलेल्या १०६ व्यक्तींवर कुठल्याही प्रकारचा वॉच ठेवला जात नाही.
जालना जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या घटली आहे. असे असले तरी ब्रिटेनमध्ये कोरोनाने आपले रूप बदल्याने कोरोनाची भीती वाढली आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासन कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही.
सध्या शहरातील बाजारपेठांसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातच कोणीही नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.
होम क्वारंटाईन रूग्णांचे काय
अनेकजण कोविड सेंटरमध्ये भरती होण्यास टाळाटाळ करीत असल्याने शासनाने होम क्वारंटाईन राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बहुतांश रूग्णांनी होम क्वारंटाईन राहण्यास पसंती दिली आहे. होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णाला नियमावली ठरवून दिले आहे. तसेच दररोज संबंधित रूग्णांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला आहे. परंतु, प्रशासनाकडून होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांवर कुठलाही वॉच ठेवल्या जात नाही. होम क्वारंटाईन असलेले रूग्ण घराबाहेर पडत असल्याने कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
जालना जिल्हाभरात १०६ जण होम क्वारंटाईन आहे. होम क्वारंटाईन राहण्यासाठी संबंधितांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच आरोग्य कर्मचारी दररोज त्यांची पाहणी करत आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांनी घराबाहेर पडू नये.
- अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक