परतूर : तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू व हरभऱ्याची पेरणी केली आहे. सध्या गहू व हरभऱ्याचे पीक चांगलेच बहरले आहे. त्यातच कडाक्याची थंडी पडत असल्याने पिकास पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे.
परतूर तालुक्यात यंदा जूनच्या सुरूवातीपासून जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे खरिपाची पिके जोमात आली होती. परंतु, ऐन पिके काढणीला आली अन् तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता. असे असले तरी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने रब्बी हंगामात गहू, हरभर, बाजरी या पिकांची पेरणी केली. सध्या गहू व हरभऱ्याचे पीक जोमात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू व हरभऱ्यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागील आठवड्यापासून तालुक्यात थंडी वाढली आहे . याचा फायदा हरभरा व गव्हाच्या पिकांना होत आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत असून, खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बीतील पिकांतून निघेल अशी अशा शेतकरी व्यक्त करीत आहे.
चौकट
कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद
दोन वेचणीतच कापासाचे पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची फरदड न घेता कपाशी उपटून गहू व हरभऱ्याची पेरणी केली. त्यामुळे यंदा तालुक्यात गहू व हरभऱ्याच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.