लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा सवार्गीण विकास करण्यात येत आहे. नवतेजस्विनी योजनेच्या माध्यमातून महिलांचा विकास करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले.ठाकरे या दोन दिवसीय जालना जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. सोमवारी शासकीय विश्रामगृहात त्यांच्या अध्यक्षेखाली जालना जिल्हा कार्यालयाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ‘त्या’ बोलत होत्या.याप्रसंगी माविम जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते, शिवसेना जिल्हा संघटक सविता किवंदे व इतर अधिकारी उपस्थित होते. ठाकरे यांनी माविम करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच नवतेजस्विनी कार्यक्रम सप्टेंबर २०१९ पासून कार्यान्वित होईल, अशी घोषणा त्यांनी केली. जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि शहरात महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गट तयार करावेत. तसेच या बचत गटांमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या हस्ते बदनापूर तालुक्यात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बदनापूर तालुक्यातील पोफळे यांच्या शेतात बचत गटांच्या महिलांची बैठक घेण्यात आली.त्यांनी माविम जालना अंतर्गत राबविण्यात येणाºया योजना व बचत गटांबाबत माहिती दिली. तसेच तळणी व मंठा या लोकसंचलित साधन केंद्र बळकटीकरण करण्यासाठी नाबार्ड मार्फत अर्थ सहाय्य मिळण्याबाबत अध्यक्षांकडे विनंती केली.या बैठकीत सहा-जिल्हा समन्वय अधिकारी शीला जवंजाळ, लेखाधिकारी मुकुंद जहागीरदार यांच्यासह माविम जिल्हा कार्यालय व सर्व तालुका लोकसंचलित साधन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
नवतेजस्विनी योजनेच्या माध्यमातून महिलांचा विकास करणार-ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:52 IST