रोहिलागड गावाची लोकसंख्या सात हजारांपेक्षा अधिक आहे. गावाला ग्रामपंचायतीच्या नऊ विहिरी आहेत. तीन पाइपलाइन असून, नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाला. यामुळे विहिरी तुडुंब भरल्या आहेत. परिणामी, पाण्याचा प्रश्न सुटला आहे. असे असतानाही गावात मागील १२ दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत मोटार सुरू होत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. याबाबत अंबड येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मुबलक पाणीसाठा असतानाही नागरिकांना शेंदून पाणी आणावे लागत आहे. काही ग्रामस्थांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत वीज वितरणचे उपअभियंता दारकोंडे यांना विचारले असता, त्यांनी चौकशी करून सांगतो, असे सांगितले. परिसरात दरवर्षी दुष्काळी परिस्थिती असते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंंती करावी लागते. यंदा चांगला पाऊस झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न सुटला होता; परंतु आता विजेअभावी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
रोहिलागड येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST