वडीगोद्री : ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आता पेटू लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत युवकांनी सोशल मीडियावरून रान उठविले असून, अनेकांनी वर्षभरापासून सामाजिक कार्यावर भर दिला आहे. त्यामुळे गावातील ज्येष्ठ पदाधिकारीही आपल्या पॅनलमध्ये युवकांना संधी देण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत.
अंबड तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात करीत उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये युवा वर्गाला राजकारणात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या तालुक्यात रब्बी लागवड व मशागतीच्या कामात शेतकरी गुंतले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षातील मंडळी रात्रीची वेळ साधून संभाव्य युवा उमेदवारांच्या भेटीगाठी घेत आहेत. ग्रामपंचायत सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर घोषित होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन राखीव जागांसाठी त्या-त्या प्रवर्गनिहाय उमेदवारांची चाचपणी करीत आहेत.