गणेश जन्मोत्सव साजरा
भोकरदन : शहरातील गणपती मंदिरात श्री गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गणेश जन्मकथा अध्यायाचे वाचन करण्यात आले. तसेच पूजा, अभिषेक, आरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.
बंजारा समाजाचे मंठा तहसीलदारांना निवेदन
मंठा : राज्यमंत्री मंडळातील मंत्री संजय राठोड यांची पूजा आत्महत्या प्रकरणात नाहक बदनामी केली जात असून, ती थांबवावी. तसेच आ. राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे तो राजीनामा स्वीकारू नये, अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने मंठा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच बंजारा समाजाचे नेतृत्व संपविण्याचे हे कटकारस्तान असल्याचेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. यावेळी तालुका गोर बंजारा समाजाचे पदािधकारी, सदस्य उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
जालना : शासनाच्या महा- डीबीटी पोर्टलवर एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे. पोर्टलवर अर्ज केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश मिळाले असतील त्यांनी सातबारा, आठ अ, आधार कार्डसह इतर कागदपत्रे कृषी विभागाच्या कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
अंबड शहरात दत्ताराव राठोड यांचे व्याख्यान
अंबड : सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गोविंदराव जवळगावकर नाट्यगृहात प्रा. दत्ताराव राठोड यांचे व्याख्यान पार पडले. राठोड यांनी विविध दाखले देत उपस्थितांचे प्रबोधन केले. यावेळी प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, श्रीराम जाधव, प्रल्हाद जाधव, बाबुराव राठोड, नारायण राठोड, इंजि. मदन पवार, विठ्ठल चव्हाण, कैलास राठोड आदींची उपस्थिती होती.
नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करा
पारध : शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन पारध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांनी केले. पारध येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. संग्राम देशमुख, माजी सभापती परमेश्वर पाटील, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र लोखंडे, श्याम देशमुख, पवन लोखंडे, गणेश तेलंग्रे आदींची उपस्थिती होती.