टेंभुर्णी : महिलांचे सबलीकरण व्हावे, यासाठी राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्यात आला. ग्रामपंचायतीत महिलांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. मात्र, असे असले, तरी आजही ग्रामीण भागात राजकारणातील सहभाग केवळ कागदपत्रीच दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर निवडणूक जिंकल्यानंतर सत्काराचा एक हारही गळ्यात पडण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र टेंभुर्णीसह परिसरात दिसून येत आहे.
टेंभुर्णी ग्रामपंचायतीतील १७ सदस्यांत १० महिला सदस्या विजयी झाल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर गावात अद्याप एकाही महिला सदस्याचा कुठे सत्कार झाल्याचे दिसून येत नाही. कुठे पती, कुठे मुलगा, तर कुठे दीर या महिलांचा सत्कार मोठ्या सम्मानाने स्वीकारण्यात धन्यता मानत आहेत. अशीच परिस्थिती परिसरातील निवडणूक झालेल्या अन्य गावांतही दिसून येत आहे. या महिला सदस्यांना आता सत्काराच्या एका हारासाठी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीपर्यंत तरी अजून वाट पहावी लागणार असल्याचे अनेक जण बोलून दाखवीत आहे.
चौकट
महिलांनी राजकारणात खंबीरपणे नेतृत्व करावे, म्हणून शरदचंद्र पवार यांनी प्रथम महिलांसाठी ५० टक्के आरक्षण दिले. मात्र, आजही ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदपर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी महिलांना बाजूला ठेवून पुरुषच सत्ता गाजवीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. अनेक महिला सदस्या उच्चशिक्षित आहेत, परंतु त्यांनाही पुढे येऊ दिले जात नाही. यापुढे महिला सदस्यांच्या सबलीकरणासाठी आम्ही जिल्हाभर कार्यशाळेचे आयोजन करू.
सुरेखा लहाने, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस