जालना : शहरातील बसस्थानक परिसरातून रोज हजारो प्रवासी ये- जा करीत आहेत. असे असतानाही प्रवाशांना हव्या त्या सोयी- सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बसस्थानक परिसरातील रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. बस येता- जाता प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. जालना शहर राज्याच्या मध्यभागी म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे शहरातील बसस्थानकातून रोज हजारो प्रवासी ये- जा करतात.
मागील काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या जवळ पत्र्याचे सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे. परंतु, या शौचालयाची नियमित स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे अनेक प्रवाशी उघड्यावर लघुशंका करीत असल्याने महिला प्रवाशांची कुचंबना होत आहे. बसस्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी एटीएमद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, अनेक प्रवाशांना पाण्याच्या एटीएमबाबत अधिकची माहिती नसल्याने अनेक जण विकतच्या पाणी बाॅटलवर आपली तहान भागवित असल्याचे चित्र बसस्थानकात दिसून येत आहे. रात्री अनेकदा बसस्थानकात मोकाट कुत्र्यांसह जनावरांचाही वावर मोठ्या प्रमाणात असतो. याचाही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. एकूणच बसस्थानक परिसरात भौतीक सुख- सुविधा प्रवाशांना मिळून देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
चौकट
बसस्थानक परिसरात अनेकदा रात्रीच्यावेळी मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा मुक्काम असतो. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.
मागील काही दिवसांपासून बसस्थानकातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, जागोजागी खडी उखडली आहे.
त्यामुळे बसच्या चाकाखालून खडा उडून प्रवाशांना लागण्याची भीती नाकारता येत नाही.
एकूणच बसस्थानकात अपुर्या असलेल्या सोई- सुविधा प्रवाशांना मिळवून देण्यासाठी आगरा प्रमुखांनी लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
सुविधांचा अभाव
तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेले पत्र्याचे शौचालय हे एका बाजुला आहे. तसेच या सुलभ शौचालयाची नियमित स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी अनेक महिला व पुरूष उघड्यावर लघुशंका करीत आहेत. वेळीच राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कोट
प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी बसस्थानकात पाण्याचे एटीएम मशिन बसविण्यात आले आहे. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम करण्याबाबत मध्यंतरी टेंडर देण्यात आलेले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बसस्थानक परिसरात सिमेंट कॉक्रेटिकरण केले जाणार आहे.
- पंडित चव्हाण, आगारप्रमुख
मी नियमीत जालना शहरात ये- करीत आहे. बसस्थानक परिसरात असलेल्या शौचालय परिसरात मोठी अस्वच्छता पसरलेली आहे. तसेच बसस्थानकातील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वेळीच याकडे रा.प.च्या आगार प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- नितीन दुभलकर, प्रवासी
बसस्थानकात पाण्याचे एटीएम मशिन बसविल्याचे सांगितले जात आहे. परंतु, मशिन कोठे आहे, याची माहिती नसल्याने विकतच्या बॉटलवर तहान भागविली आहे. शिवाय महिला व पुरूषांचे स्वच्छतागृह जवळ असल्याने महिला तिकडे जाणे टाळतात. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे.
- दुर्गा तलेकर, महिला प्रवासी