तालुक्यात जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ६० ग्रामपंचायतींच्या १८६ प्रभागांमधील ५०४ जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे छाननी व माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणात आता किती उमेदवार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील दावलवाडी ग्रा.पं.मध्ये दोन, दुधनवाडी ग्रा.पं.मध्ये एक, सागरवाडी ग्रा.पं.मध्ये सात, ढासला ग्रा.पं. चार, भराडखेडा ग्रा.पं. १, अंबडगाव ग्रा.पं. ७, चित्तोड ग्रा.पं. एक, नजीक पांगरी ग्रा.पं. १, पाडळी- रामखेडा ग्रा.पं. ६, म्हसला- भातखेडा ग्रा.पं. ९, विल्हाडी ग्रा.पं. ३, नांदखेडा ग्रा.पं. ७, राजेवाडी- (खो) ग्रा.पं. ७, मालेवाडी (सुं) ग्रा.पं. २, वंजारवाडी ग्रा.पं. ४, वाल्हा ग्रा.पं. ९, आन्वी राळा ग्रा.पं. १, धोपटेश्वर ग्रा.पं.मध्ये १ अशा एकूण १८ ग्रामपंचायतींमधील ७३ उमेदवारांसमोर या निवडणुकीच्या रिंगणात प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. तसेच आता एकूण ४३१ जागांसाठी दुरंगी, तिरंगी अशी लढत होणार आहे.
सहा ग्रामपंचायती बिनविरोध
बदनापूर तालुक्यातील ६० पैकी अंबडगाव, वाल्हा, नांदखेडा, राजेवाडी (खो.), सागरवाडी, म्हसला- भातखेडा या सहा ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत. या सहा ग्रामपंचायतींमध्ये जेवढ्या जागांसाठी निवडणूक होत आहे, तेवढेच नामनिर्देशनपत्र आले आहेत. त्यामुळे आता ६० पैकी ५४ ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराचा धुराळा उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
६६८ कर्मचारी कामकाज पाहणार
तालुक्यात होत असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तालुक्यात एकूण १६७ मतदान केंद्रे असून, या प्रत्येक मतदान केंद्रावर एकूण ४ असे ६६८ कर्मचारी मतदान प्रक्रियेचे काम करणार असल्याची माहिती तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार दळवी, शिंदे यांनी दिली.
१२ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० लाखांचा निधी
बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. नारायण कुचे यांनी या निवडणुकांच्या अनुषंगाने बिनविरोध ग्रामपंचायतींना गावातील विकास कामांसाठी आमदार निधीतून प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. या आवाहनाला या मतदारसंघातील विविध ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघातील बदनापूर तालुक्यातील राजेवाडी (खो.), सागरवाडी, वाल्हा, अंबडगाव, म्हसला- भातखेडा, नांदखेडा, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को, उंबरखेडा, निमगाव व अंबड तालुक्यातील देशगव्हाण, निहालसिंहवाडी, चांभारवाडी या १२ ग्रामपंचायती बिनविरोध होणार असून, त्यांना हा निधी लवकरच वितरित केला जाणार असल्याचे आ. नारायण कुचे यांनी सांगितले.