ऑफिससमोरून दुचाकी चोरीस
जालना : शहरातील क्रीडा संकुलन परिसरातील ऑफिससमोर लावलेली दुचाकी (एमएच.२१ बीजे ५५२२) चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी रमेश जयाजी वारे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ढवळेश्वर येथे गोडावून फोडून मुद्देमाल लंपास
जालना : शेतातील गोडावूनचे पत्र उचकटून चोरट्यांनी रस्सी, गाडन पाइप ४० बंडल, केबल असा १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील ढवळेश्वर येथे घडली. याप्रकरणी मनोज विठ्ठ्ल येशाल यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ना.पो.कॉ. बोडखे करीत आहेत.
महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची व्यापाऱ्याविरोधात तक्रार
देऊळगाव राजा : कोरोना चाचणी तपासणी शिबिरात शहरातील एका व्यापाऱ्याने महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्याशी गैरवर्तणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. शहरातील एका व्यापाऱ्याने १९ फेबुवारी रोजी तपासणी शिबिर सुरू असताना महिला वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांसोबत गैरवर्तणूक करून शिवीगाळ केली. याबाबत रविवारी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्हाध्यक्षपदी डॉ. सय्यदलाल सय्यद गफूर
जालना : महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठानच्या जालना जिल्हा युवक जिल्हाध्यक्षपदी डॉ. सय्यदलाल सय्यद गफूर यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष अजहरूद्दीन शेख यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
जालना : घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ग्रुपच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संदीप कदम, उमेश कथले, युवराज सावंत, हरिओम साबळे, सिद्धेश्वर साबळे आदींची उपस्थिती होती. श्री स्वामी समर्थ ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान संकलन करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी गजानन इंगळे, धोंडीराम पडूळ, डॉ. दिना वुड, नंदकिशोर घोगरे, विठ्ठल आवटे यांनी परिश्रम घेतले.