जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांना आज जीव धोक्यात घालून ज्ञानार्जनासाठी जावे लागत आहे. अनेकवेळा तर बसमध्ये जागा मिळत नसल्याने विद्यार्थी चक्क टपावर बसत असल्याचा प्रकार गुरूवारी मंठा तालुक्यातील उस्वद येथे पहावयास मिळाला.मंठा ते उस्वद यामध्ये ३० किमी. चा अंतर आहे. यादरम्यने अनेक गावांचा संपर्क येतो. उस्वद येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असल्याने परिसरातील गावातील विद्यार्थी हे शिक्षणासाठी दररोज उस्वदला येतात. परंतु या मार्गावर बसफेऱ्या अपुऱ्या असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खोराड सावंगी, किनखेडा, नळडोह, किर्तापूर, पेवा, मोहदरी, अंभोरा, आंधवाडी आदी गावांतील विद्यार्थी हे उस्वद येथे शिक्षणासाठी येतात. यात विद्यार्थिनींसाठी सकाळी आणि सायंकाळी मानव विकास योजनेंतर्गतची एक बस धावते. परंतु संख्या अधिक असल्याने या बसमध्ये गर्दी होते. तसेच दुपारच्यावेळी विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येत असलेली साधी बसही अपुरी पडत असल्याने विद्यार्थी चक्क टपावर बसून प्रवास करू लागले आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर जादा बसफेऱ्या वाढविण्याची मागणी पालकांसह विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.
बसच्या टपावर बसून प्रवास : अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 19:45 IST