पारध : आरटीई कायद्यानुसार ज्या शाळेत सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या शंभर असेल अशा शाळेत कला, क्रीडा, कार्यानुभव निदेशकांच्या नियुक्त्या २०१६मध्ये तीन वर्षांसाठी देण्यात आल्या होत्या. परंतु, मुदत संपल्यानंतर या निदेशकांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. परिणामी अनेक निदेशकांवर उपासमारीची वेळ आली असून, अनेकजण इतर कामे करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत.
सेवा समाप्तीनंतर पटसंख्या असलेल्या शाळेत आज ना उद्या नियुक्ती मिळेल, अशी आशा या निदेशकांना होती. अनेकांनी विना मानधन शाळेवर काम केले. मागील वर्ष कोरोनात गेले आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी या अंशकालीन निदेशकांना ना मानधन मिळाले, ना नियुक्ती. सेवा सुरू नसल्याने या अंशकालीन निदेशकांवर उपासमारीची वेळ आली असून, शासन, प्रशासनाने लक्ष देऊन नियमानुसार नियुक्ती द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोरोनात प्रशासनाला मदत
कोरोना काळात शारीरिक शिक्षण व आरोग्य या पदावरील निदेशकांनी सुरक्षित अंतर पाळण्याबाबत प्रशासनाला सहकार्य करून काम केले. कोरोनात केलेल्या कामाची दखल घेऊन नियुक्त्या देऊन मानधन सुरू करावे. नियुक्त्या मिळाल्या तर उपासमारीची वेळ येणार नाही.
देवेंद्र लोखंडे, शारीरिक शिक्षण निदेशक
सहा वर्षांपासून प्रतीक्षा
रोजंदारीपेक्षाही कमी मानधन अंशकालीन निदेशकांना मिळते. परंतु, आज ना उद्या पुन्हा नियुक्त्या मिळतील, या आशेवर अनेक निदेशकांनी कामे केली. आता शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक शाळांची पटसंख्या चांगली आहे. तरीही नियुक्त्या दिल्या जात नाहीत.
धनंजय मोकाशे, कला निदेशक