कुंभार पिपळगाव : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रूग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आता प्रशासन लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे. असे असतानाच व्यापाऱ्यांनी मात्र लॉकडाऊन न करता नियम कडक करावे, अशी मागणी केली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात दिवसागणिक ५०० ते ५५० रूग्ण वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही नागरिक नियमांचे पालन करीत नाही. त्यातच दिवसागणिक रूग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. आता प्रशासनाकडे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय उरला आहे. त्यानुसार प्रशासनाच्या हालचालीदेखील सुरू आहे. परंतु, व्यापारी मात्र लॉकडाऊनला विरोध करीत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने लॉकडाऊन न करता नियम कडक करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शासनाला लॉकडाऊन करावा लागला होता. या लॉकडाऊनमुळे नागरिकही हैराण झाले होता. अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मोठी कसरत करावी लागली. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांचेदेखील मोेठे नुकसान झाले होते. त्यामुळेच प्रशासनाने लॉकडाऊन न करता नियम कडक करावे, अशी मागणी होत आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढती रूग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. आता प्रशासनाने लॉकडाऊन करू नये. नियम कडक करावे. जेणे करून गोरगरीब नागरिकांना याचा त्रास होणार नाही.
रामेश्वर गोरे
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करावे. लॉकडाऊन करणे यावर उपाय नाही.
-अंगत बोटे, हॉटेल व्यावसायिक