लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोनातील लॉकडाऊनमध्ये गरजूंना आधार ठरलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वाटपाची डेडलाइन संपली आहे. त्यामुळे आता ज्यांच्या हाताला अद्यापही काम नाही, अशा गरजूंची मोठी गैरसोय होणार असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब पाहता केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मोफत धान्य वाटप केले. जिल्ह्यात प्रति माह सरासरी तीन हजारांवर कुटुंबांना याचा लाभ मिळाला. यात १७ हजार ५१६ टन गहू, ३७ हजार ६०५ टन तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. यात डाळिंचेही मोफत वाटप करण्यात आले आहे. मात्र, मोफत धान्य वाटपाची डेडलाइन आता संपली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेकांच्या हाताला अद्याप काम मिळालेले नाही. काही व्यवसाय, कंपन्या बंद असल्याने तेथील कामगारांचेही प्रश्न कायम आहेत. त्यामुळे गरजूंना मोफत धान्य वाटपाची मागणी होत आहे.
रोजगाराचा प्रश्न कायम आहे, पोट कसे भरणार
मोफत धान्य वाटपामुळे गरजूंना मोठा आधार मिळाला. लॉकडाऊन शिथिल असले तरी आजही आमच्या अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडलेलीच आहे. त्यामुळे पोट कसे भरायचे? असा प्रश्न असून, शासनाने गरजूंना मोफत धान्य वाटप करावे, अशी मागणी वडीगोद्री येथील अविनाश खरात यांनी केली.
हाताला काम नसल्याने अनेक प्रश्न कायम
लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी आजही आमच्यासारख्या अनेक गरजूंच्या हाताला काम मिळालेले नाही. त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती बेताचीच आहे. त्यात आता मोफत धान्य मिळणार की नाही? हा प्रश्न कायम असून, मोफत धान्य वाटप करावे, अशी मागणी तीर्थपुरी येथील राजेंद्र जाधव यांनी केली.
शासन निर्देशानुसार पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्याचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय इतर शासकीय योजनांमधून कार्डधारकांना धान्य वाटप केले जात आहे. मोफत धान्य वाटपाबाबत शासनस्तरावरून, वरिष्ठस्तरावरून येणाऱ्या सूचनेनुसार काम केले जाईल.
-श्रीकांत भुजबळ, तहसीलदार