डोणगाव : निवृत्ती महाराज देव्हडे यांचे निरुपण
देळेगव्हाण : आधुनिक काळात आपले जीवन जगण्यासाठी मानवाने संतांचे वचन व संतांच्या विचारांवर विश्वास ठेवला की, सुख प्राप्त होते. शिवाय संकटातून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन लाभते, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज देव्हडे यांनी केले.
जाफराबाद तालुक्यातील डोणगाव या ठिकाणी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जगात साधू- संतांचे महत्त्व आहे. संतांचा सहवास लाभल्यानंतर अडचणींचा मार्ग मोकळा होतो. संतांचे विचार हे ज्ञान देणारे असून, जो मनुष्य रस्ता भटकला त्याला योग्य मार्गदर्शन करण्याची ताकद संतांच्या विचारात आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, संतांच्या संगतीत असणाऱ्या लोकांची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. ऐहिक सुखाच्या अभिलाषेने माणूस आपले माणूसपण विसरत चालला आहे. आपल्या सुखासाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे समाजात अशांती, अविश्वास, संघर्ष, मानसिक तणाव निर्माण होत आहे. यावेळी त्यांनी प्रभू श्रीरामाच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. आज व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांची उदाहरणे देऊन व्यसनापासून परावृत्त होण्याचे आवाहन महाराजांनी यावेळी केले.
चौकट
या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त ज्याप्रमाणे आपण देवाची भक्ती करतो, त्याप्रमाणे प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, जेणेकरून आम्ही कीर्तनकार कीर्तनाचे फलित झाल्याचे समजू, असा भावनिक संदेशही निवृत्ती महाराज देव्हडे यांनी दिला. याप्रसंगी हभप शरद देवडे, भजन सम्राट किरण महाराज डवले, नाना महाराज पंडित, कैलास महाराज पंडित आदींची उपस्थिती होती.