रमाबाई नगरमध्ये माता रमाई यांना अभिवादन
जालना : माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील रमाबाई नगरमध्ये प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच रमाबाई नगर ते मम्मादेवीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी प्रभाकर घेवंदे, दिनकर घेवंदे, कल्पना घेवंदे, वैशाली बनसोडे, ज्योती घेवंदे, रमा होरशील आदी उपस्थित होते.
आगडगाव भोंबे शिवारात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आगडगाव भोंबे शिवारात कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मका, कापूस, फळलागवड आदीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहसंचालक डी. एल. जाधव यांनी विविध विषयांवर माहिती दिली. कार्यक्रमाला भगवान कापसे, एस. बी. पवार, तालुका कृषी अधिकारी आर. एच. भुते, दामोदर भोंबे, कृषी सहाय्यक भोंबे, भोसले, जाधव, सिनकर, बारवाल, गावंडे, उबाळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
बांधकाममंत्री घेणार विकासकामांचा आढावा
जालना : नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे ११ फेब्रुवारी रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामांच्या आढाव्यासंदर्भात बैठक घेतली जाणार आहे. तसेच सायंकाळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
वरूड येथे स्वच्छता मोहीम
वरूड : जाफराबाद तालुक्यातील वरूड (बु.) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत गावातील विविध भागातील कचरा संकलित करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत ग्रामसेवक राजेंद्र परिहार, मंगेश पाटील, सुभाष सातव, संतोष वाघमारे, रवींद्र वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ, युवकांनी सहभाग घेतला होता.