बसफेऱ्या वाढविण्याची मागणी : तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील नळणी, बरंजळा साबळे, बरंजळा लोखंडे येथील शेकडो विद्यार्थी भोकरदन शहरात शिक्षणासाठी ये- जा करतात. महिनाभरापासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु तडेगाव ते भोकरदन ही एकच बस सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत असून, शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्यामुळे सकाळी नऊ वाजता तडेगाव ते भोकरदन व दुपारी दोन वाजता भोकरदन ते तडेगाव अशा बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी भोकरदन बस आगाराचे वाहतूक नियंत्रक एन.डी. राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तीन दिवसांत बस सुरू न केल्यास जाफराबाद आगार प्रमुखांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे, कृष्णा लोखंडे, विठ्ठल लोखंडे, नीलेश साबळे, भगवान साबळे, प्रकाश राऊत, ज्ञानू बकाल, शंकर साबळे, शंकर राऊत, अभिषेक लोखंडे, योगेश लोखंडे, प्रतीक लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चौकट
शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची शहरात येण्याची संख्या वाढली असून, विद्यार्थ्यांनी पासेससुद्धा काढल्या आहेत; परंतु बसच्या फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. दुपारी बस नसल्याने विद्यार्थ्यांना ८ किलोमीटर अंतरावर पायी चालत जावे लागत आहे. त्वरित बसच्या फेऱ्या वाढवाव्या नसता, आंदोलन छेडण्यात येईल.
-नारायण लोखंडे, बरंजळा लोंखडे
------------------------------------
फोटो
शे. सूफियान याचे यश
भोकरदन : भोकरदन शहरातील अत्तार गल्ली येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शे. रफिक शे. अब्दुल रज्जाक यांचे चिरंजीव शे. सूफियान याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अंतिम वर्षाच्या परीक्षेत ९९.६ टक्के गुर्ण घेऊन यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.