अंबड : शहरातील शिवसेना शहर शाखेतर्फे स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती ममता दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब इंगळे, हनुमान धांडे, अशोक बरडे, कुमार रूपवते, सुरेश राजपूत आदींची उपस्थिती होती.
वसुंधरा अभियानांतर्गत जाफराबादेत रॅली
जाफराबाद : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत येथील नगरपंचायतीच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील मुख्य रस्ता, बाजार गल्ली, बसस्थानक परिसर, तहसील रोड यासह विविध गल्ल्यांमधून काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या घोषणा दिल्या. यावेळी विजया शिंगणे, प्रल्हाद माने, भरत पाटील, धिरज गोफणे आदींची उपस्थिती होती.
प्रकल्प अधिकाऱ्यांची अंगणवाडीला भेट
घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील साठेनगर भागातील अंगणवाडी क्रमांक चारमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे वाटप होत नाही, अशा तक्रारी येताच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बैलास बडे, पर्यवेक्षिका रत्नप्रभा कुलकर्णी यांनी बुधवारी अंगणवाडीला भेट दिली. यावेळी त्यांनी आहाराच्या साहित्याच्या पंचनामा केला.
इंटरनेट विस्कळीत
जालना : मागील काही दिवसांपासून शहरातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. वारंवार इंटरनेट बंद पडत आहे. त्यामुळे इंटरनेटची गती कमी झालेली आहे. याचा ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ही नित्याचीच बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रचाराला वेग
जालना : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या गावोगाव प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार विविध प्रलोभने दाखवून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवाय मतदारांची जेवणाची रलचेलही सुरू आहे.
आसरखेडा- बावणे पांगरी रस्त्याची दुरवस्था
बदनापूर : तालुक्यातील आसरखेडा ते बावणे पांगरी या सहा किलोमीटर रस्त्याची मागील काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रात्री- अपरात्री किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वेळीच रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे.
९ जागांसाठी २६ उमेदवार
जालना : तालुक्यातील जामवाडी येथील ग्रामपंचायतच्या नऊ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, ४१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये एक अर्ज अवैध ठरला. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात आठ उमेदवार अपक्ष असून, प्रत्येकाने गावात प्रचाराला सुरुवात केली आहे.