परतूर : शहरातील मुख्य सिनिअर कॉलेज रोड, शिवाजीनगर, पेट्रोलपंप या रस्त्यांसह गल्ली- बोळांत सर्रास वाहने चालविणाऱ्यांची सख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वेळीच विनापरवाना वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.
बँक खातेधारकांची मोठी गैरसोय
अंकुशनगर (महाकाळा) : अंबड तालुक्यातील अंकुशनगरसह वडीगोद्री परिसरात अनेक बँका आहेत; परंतु या बँकांमध्ये एटीएमची सुविधा नसल्याने खातेधारकांची गैरसोय होत आहे. बँक ग्राहकांना पैसे काढण्यासाठी तासनतास बँकांमध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे. वेळीच या बँकांमध्ये एटीएमची सुविध उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
रस्त्याचे नूतनीकर; वाहनधारकांना दिलासा
जालना : शहरातील बालाजी चौकापासून नवीन मोढ्यांकडे जाणाऱ्या रस्त्याचे नूतनीकर केले जाणार आहे. यासाठी रस्त्यालगत खडी व इतर साहित्य आणून टाकण्यात आले असून, वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मागील काही दिवसांपासून या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असल्याने रस्त्याचे काम करण्याची मागणी होत होती.
अध्यक्षपदी गाडे
वडीगोद्री : आदर्श ग्राम विकास फाउंडेशनच्या (पुणे) जालना अध्यक्षपदी लखमापुरी येथील युवक सुनील गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शुक्ला व प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण सरवदे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. याबद्दल गाडे यांचे गाव परिसरातून स्वागत होत आहे.
रविवारी कार्यशाळा
जालना : भारतीय जैन संघटनेच्या वतीने रविवारी रात्री सात ते नऊ या वेळेत राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणे येथील कुशल वैज्ञानिक डॉ. महेंद्र पालेशा यांचे आहार ते आरोग्य नवीन भोजन प्रणाली या विषयांवर व्याख्यान होणार असल्याची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन
जालना : राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अशत: अुदानित माध्यमिक- उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई, नाईक, पहारेकरी, सफाईगार, हमाल, परिचर चौकीदार आदी पदावरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर शासन निर्णयाद्वारे सदरील पदे रद्द न करता पूर्ववत करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन स्वातंत्र्यसैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
रस्त्याची दुरवस्था
दाभाडी : दाभाडी ते राजूरदरम्यान असलेल्या रस्त्यापैकी अर्ध्या रस्त्याची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वेळीच रस्त्याचे नूतनीकर करण्यात यावे, अशी मागणी वाहधारकांमधून होत आहे. दाभाडी- राजूर या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ राहत असूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जालना : स्पर्धा परीक्षेसह पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असलेल्या समस्या तात्काळ निकाळी काढाव्यात, शिवाय एमपीएससी परीक्षा, पोलीस भरती परीक्षा घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी सोडविण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी समाधान कुबेर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
लेक गावची योजनेंतर्गत पाच हजारांचे बक्षीस
जालना : लेक या गावची या योजनेंतर्गत पिंपळगाव (ता. जालना) येथील अश्विनी अंभोरे हीस विवाहाप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सदरील बक्षीस उपसरपंच रंजित कऱ्हाळे व रामेश्वर सानप यांच्या हस्ते मुलीच्या पित्याला देण्यात आले. मागील तीन वर्षांपासून सदरील योजना पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असल्याची माहिती सरपंच पालवे यांनी दिली.
शर्मा यांचा गौरव
जाफराबाद : भारज (बु.) येथील शासकीय नागरी ग्रामीण रुग्णालय औषध निर्माण अधिकारी रवींद्र शर्मा हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांच्या हस्ते त्यांचा सपत्निक गौरव करण्यात आला. याप्रसंगी संगीता शर्मा, सौरभ शर्मा, बद्रीनारायण डोईफोडे, देशमुख, गिते आदींची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना शर्मा यांनी सर्वांनी सहकार्य केल्याचे सांगितले.
जालन्यात कार्यक्रम
जालना : शहरातील समर्थनगर येथील तक्षशीला बुद्ध विहारात शौर्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, येणाऱ्या पिढीत वैचारिक क्रांती निर्माण करणे गरजेचे आहे. शिवाय लेखणीनेच आपण जगावर राज्य करू शकतो, असेही ते म्हणाले. दरम्यान उपासक व उपासिकांनी २२ प्रतिज्ञा म्हणून शौर्य दिनानिमित्त मानवंदना दिली.
सुखापुरीला शीतलकुमार बल्लाळ यांची भेट
वडीगोद्री : गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी सुखापुरी येथे नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ग्रामसुरक्षा दल व ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. ज्या गावांमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत, त्या गावातील नागरिकांनी वाद- विवाद न घालता शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी, असा सल्ला देऊन त्यांनी गावातील अवैध धंदे बंद करावेत, असेही सांगितले. यावेळी बीट जमादार चौधरी, भगवान राखुंडे, बाबूलाल बागवान, लहू राखुंडे, सुरेश लवटे, दत्ता चांगले, इलियास बागवान, प्रताप राखुंडे, अशोक चांगले आदींची उस्थिती होती.
रस्ता सुरक्षा सप्ताह
जालना : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने सध्या तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. रात्रीच्या वेळी जिल्ह्यातील विविध मार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचे आदेश मध्यंतरी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिलेले आहेत.
ग्रामस्थांमधून समाधान
पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ते भोकरदन या रस्त्याची मागील काही दिवसांपासून डागडुजी करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे सदरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांमधून होत होती.