पारध : पारध (बु) ग्रामपंचायतची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गावात पॅनल प्रमुखांकडून प्रचाराचा जोर वाढलेला आहे. उमेदवारांकडून रोजच जेवणावळ्या आणि चहा- नाश्त्याची मतदारांची व्यवस्था करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गाव परिसरातील हॉटेल, धाबे, पानटपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी दिसून येत आहे. शिवाय मतदारांनाही प्रलोभनेही दिली जात आहेत.
रस्त्यावर खड्डे
मान देऊळगाव : जालना- राजूर या मार्गावर मागील काही दिवसांपासून जागोजागी खड्डे पडले असून, वेळीच रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. विशेष म्हणजे, जालना- राजूर या रस्त्यावरून दिवस- रात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. रात्री वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेकदा किरकोळ अपघात होत आहेत. वेळीच रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
कॉर्नर बैठका सुरू
मान देऊळगाव : मान देऊळगावसह परिसरातील बावणे पांगरी, पठार देऊळगाव, दगडवाडी आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत. अनेक उमेदवार मतदारांना केवळ प्रलोभनेच देत नसून, सध्या कामेही करून देत आहेत. ही केवळ झलक असून, निवडून आल्यावर आणखी कामे केली जातील, असेही सांगितले जात आहे.