जालना : कोल्हापूर येथील आविष्कार फाऊंडेशनच्या बदनापूर तालुकाध्यक्षपदी येथील व्हीएसएस महाविद्यालयाचे डॉ. प्रसाद मदन यांची निवड करण्यात आली. या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी ही निवड केली. या निवडीबद्दल डाॅ. शिवाजी मदन, जिल्हाध्यक्षा डॉ. विद्या पटवारी, डॉ. भारत खंदारे आदींनी स्वागत केले.
रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
घनसावंगी : शहरातील रस्त्याची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अवजड वाहने जाताच धूळ उडत असून, या धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकजण आजारांनी त्रस्त आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
परतूर येथे मिरवणुकीचे आयोजन
परतूर : अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन महाअभियानास शुक्रवारी प्रारंभ होणार आहे. यानिमित्त येथे शुक्रवारी सकाळी ९ वाजता मिरवणूक काढण्यात येईल. रेल्वेगेट परिसरातून लेझीम पथकासह या मिरणुकीला प्रारंभ होणार आहे. पोलीस ठाणे, दसमले चौक मार्गे नारायण पवार चौकात मिरवणूक येईल.
यात्रा महोत्सव साजरा
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कोठाळा येथील श्री चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात वार्षिक यात्रा महोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सोहळा घेण्यात आला.
आलमगाव येथे पाहणी
अंबड : तालुक्यातील आलमगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्राची पाहणी करण्यात आली. तसेच मतदानाबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी तहसील, पंचायत समिती, पोलीस अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
समृध्दीच्या कामाला वेग, काम प्रगतीपथावर
जालना : समृद्धी मार्ग (हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे) या महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास सहा तासांत करता येणार आहे. याचे काम प्रगतीपथावर आहे. जालना जिल्ह्यातही या रस्त्याचे बहुतांश काम झाले आहे. मे अखेरपर्यंत नागपूर ते शिर्डीपर्यंत या मार्गाने जाता येणार आहे. जिल्ह्यातील बदनापूर व जालना तालुक्यातून हा मार्ग जात आहे.
शांतता कमिटीची बैठक
धावडा : ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक उमेदवार आपापल्यापरीने प्रचाराला लागले आहेत. परंतु, हे काम करीत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांनी बैठकीत केले. यावेळी बालाजी सरवदे, सुरे पडोळ, शिवाजी जाधव, अमोल गाढवे, प्रमोद कुलकर्णी हे उपस्थित होते.
नागरी सुविधांचा अभाव
जालना : शहरातील भवानीनगर परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या भागात अद्यापही नगरपालिकेकडून भूमिगत गटार, सिमेंट रस्ते व पाण्याची सुविधा देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या भागातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
विद्युत खांब वाकले
परतूर : येथील वखार महामंडळ, नागोबा मंदिर रोड व परिसरात महावितरणच्यावतीने अनेक विजेच्या खांबांची उभारणी करण्यात आली आहे. परंतु, सहा महिन्यांतच हे खांब वाकल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुलींना सायकलींचे वाटप
मंठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील राजुरेश्वर विद्यालयात मानव विकासअंतर्गत मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमराव डोंगरे, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुलींनी जिद्द व चिकाटी बाळगून यश संपादन करावे, असे आवाहन भीमराव डोंगरे यांनी केले.
मुख्य चौकांमध्ये अंधार
जालना : शहरातील मुख्य चौकांमध्ये नगर पालिका प्रशासनाने मोठा खर्च करून उभारलेले हायमास्ट दिवे बंद असल्याने रात्री चौकांमध्ये काळोख पसरत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवेही बंद आहेत. दिवाळीपूर्वीच पथदिव्यांच्या दुरूस्तीचे काम नगरपालिका प्रशासनाने केले होते. मात्र, बसस्थानक ते भोकरदन नाका मुख्य रस्त्यावरील पथदिवे चार दिवसांताच पुन्हा बंद पडले आहेत.
जयंतीनिमित्त अभिवादन
जालना : अंबड तालुक्यातील आलमगाव येथील राजुरेश्वर विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक दीपक केजभट, रामेश्वर बागल, जीवन झिंजुर्डे, पुंडलिक पाटील, मंगेश फटाले, सुरेंद्र जगताप, व्यंकटेश शेळके, सोमनाथ वाघुंर्डे, भिसे, पडघन, घुगे, धोडिंबा देशमुख आदींची उपस्थिती होती.