खडकपूर्णाचे पाणी देण्याची मागणी
जाफराबाद : तालुक्यातील अकोलादेव गटातील गावशिवारातील शेतीला उपसा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्पाचे पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार केशव डकले यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर भगवान बनकर, नागोराव कापसे, रमेश राठोड, सुनील बनकर, साईनाथ निलक, रामदास घाडगे, बाबासाहेब जाधव, योगेश बनकर, शरद पवार, सुभाष बनकर, ज्ञानदेव बनकर आदींच्या सह्या आहेत.
कोरोनामुळे आठवडी बाजारावर प्रतिबंध
नेर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासन स्तरावरून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून नेर गावात भरणाऱ्या आठवडी बाजारावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. ग्रामस्थांनी नियमित मास्क वापरावा, आरोग्य विभागाने दिलेल्या प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच बबीबाई पठाण, ग्रामविकास अधिकारी रवींद्र कोल्हे यांनी केले आहे.
उर्दू शाळा इमारतीच्या दुरुस्तीची मागणी
जाफराबाद : शहरातील उर्दू शाळेच्या इमारतीची मोठी दुरवस्था झाली आहे. शाळेत शंभरावर विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असून, तीन शिक्षिकही कार्यरत आहेत. सध्या या शाळेच्या इमारतीची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या ठिकाणच्या इमारतीची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रियाज रहीमखा पठाण व इतरांच्या सह्या आहेत.