जालना : वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाला स्पीडगन व्हॅन मिळाली आहे. या व्हॅनद्वारे मागील वर्षभरात अतिवगाने वाहन चालविणाऱ्या १,५२८ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख २८ हजार रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे.
भरधाव वेगाने वाहन चालविल्याने अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावावा लागला. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहावे, यासाठी शासनाने स्पीडगन व्हॅन अंमबलात आणली. या व्हॅनद्वारे वाहनांचा वेग तपासल्या जातो. जालना जिल्हा पोलीस दलाला २०१९ या वर्षांच्या सुरुवातीलाच स्पीडगन व्हॅन मिळाली होती. गतवर्षी म्हणजेच २०२० मध्ये या व्हॅनद्वारे वाहतूक पोलिसांनी १५२८ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तसेच जानेवारी, २०२० या महिन्यात तब्बल १४० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या अंतर्गत पोलीस विभागाच्या वतीने ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी रस्ता सुरक्षा सप्ताहात वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केले आहे.
नियम मोडणाऱ्यास एक हजार रुपयांचा दंड
शासनाने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर वाहने चालविताना वेगाची मर्यादा ठरवून दिलेली आहेत. स्पीडगन व्हॅनद्वारे सदरील वाहनाचा वेग तपासल्या जातो. त्यानुसार, वाहन न चालविणाऱ्या वाहनधारकावर मोटर वाहन कायदा ११२/ १८५ नुसार कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकाला १ एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जातो.
मागील वर्षभरात अतिवगाने वाहन चालविणाऱ्या १,५२८ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. जानेवारी महिन्यात तब्बल १४० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहनधारकांनी नियम मोडू नये, अन्यथा कारवाई केली जाईल.
यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा जालना