जालना : जालना जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जमिनीचे सर्वेक्षण आठवडाभरात पूर्ण करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिका-यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी आयोजित मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. येणा-या काळात पुरेशा प्रमाणात वीज पुरवठ्यासाठी संपूर्ण राज्यात सौरउर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सौजऊर्जेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राची उभारणी करण्यासाठी २० एकर आणि १३२ के.व्ही. उपकेंद्राच्या उभारणीसाठी १०० एकर जागेची आवश्यकता असते. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान जमीन उपलब्ध आहे. या जमिनीचा उपयोग सौरउर्जा प्रकल्प उभारणीसाठी केला जाईल. तसेच ज्या ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध नाही तिथे शेतक-यांची किंवा इच्छुक संस्थाची जमीन भाडेतत्त्वावर घेतली जाईल.बैठकीस जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जालन्याचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके, भोकरदनचे हरिश्चंद्र गवळी, अंबडचे प्रवीण धरमकर, तहसीलदार विपीन पाटील, अधीक्षक अभियंता कैलास हुमने यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.-------------निधी वेळेत खर्च कराजिल्हा वार्षिक योजनेच्या पुनर्विनियोजनाचा आढावाही लोणीकरांनी घेतला. जिल्ह्याच्या विकासासाठी वार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मराठवाड्याच्या विकासाच्या नियोजनाची बैठक वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला अधिकाधिक निधी प्राप्त होण्यासाठी सर्व विभागांनी विकास कामांवर आधारित उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण करावे. तसेच चालू वर्षात यंत्रणांना देण्यात आलेला निधी पूर्णपणे खर्च होईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही लोणीकर यांनी दिले.------------------
सौरऊर्जा निर्मितीचा पायलट प्रकल्प राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:08 IST