जालना : शासकीय वसतिगृह सुरू करावेत यासह इतर विविध मागण्यांसाठी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवारी समाजकल्याण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी युवकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
शासकीय वसतीगृह त्वरित सुरू करा, वसतिगृह आमच्या हक्काचे, शिष्यवृत्ती आमच्या हक्काची स्वाधार योजना तत्काळ सुरू करा, सरकार हमको पढणे दो देश को आगे बढने दो, विद्यार्थ्यांचा निर्वाहभत्ता त्वरित करा, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. त्यानंतर समाज कल्याणचे कार्यालयीन अधिक्षक वाघ, अंभोरे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्याबाबत सहाय्यक आयुक्त गवले यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात व वसतिगृहातील पायाभूत सुविधा देण्याबाबत चर्चा केली. तसेच भोजन ठेका प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशी मागणीही करण्यात आली.
स्वाधार संदर्भात महाविद्यालय विद्यार्थ्यांची उपस्थिती कार्यालयाला लवकर देत नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नासंदर्भात सर्व प्राचार्यांची बैठक बोलून त्यांना सक्त ताकीद द्यावी, स्वधार योजना व विना पावती अवाजवी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांची चौकशी करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून घेतलेले प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क परत करावे, विना पावती शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर फौजदारी कारवाई करावी, जालना शहराच्या ठिकाणी एक हजार मुलांची क्षमता असलेले व ५०० मुलींची क्षमता असलेेले वसतीगृह सुरू करावे, आदी मागण्याही करण्यात आल्या. यावेळी राज्य उपाध्यक्ष ॲड. अनिल मिसाळ, जिल्हा सेक्रेटरी राहुल हनवते, जिल्हाउपाध्यक्ष अजित पंडित, जिल्हासह सेक्रेटरी पवन दांडगे, शंकर डोईफोडे, आकाश लांडगे, सोहेल शेख, मुजीब शेख, आकाश वाहुळे, करण ढिलपे, वैभव शिंदे, राजेश तुपे, प्रवीण गाडेकर, विश्वजीत मगरे, अमोल मगरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
तर आंदोलन करू
आंदोलकांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्या मांडल्या आहेत. समाजकल्याण विभागाने अडचणी त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. मागण्यांची दखल घेवून उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
फोटो