जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार गुरूवारी सायंकाळी थंडावला आहे. शुक्रवारी मतदान होत असल्याने उमेदवारांनी दरोदारी फिरून प्रचार केला. ग्रामपंचायत निवडणुकीत नात्यातील माणसेच एकमेकांविरुध्द उभी असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. भोकरदन तालुक्यातील बाणेगावात सासूविरुध्द सून, टेंभुर्णीत बहिणीविरुध्द बहीण तर तळणी गावात जाऊविरुध्द जाऊ अशी लढत होणार आहे. पिंपळगाव रेणुकाई येथे नणंदेविरुध्द भावजय यांचा सामना होत आहे. केदारखेडा ग्रामपंचतीच्या निवडणुकीत मालकाविरुद्ध सालदार तरुणाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जवखेडा ठोंबरे गावात मामा विरुद्ध भाचा अशी लढत होत आहे,. एकूणच निवडणुकीच्या निमित्ताने रक्ताचे नाते सुध्दा दूर करून आमने-सामने लढती होत आहे.
बाणेगावात सासूविरूध्द सून
बाणेगाव येथे होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच प्रभागात सासू विरूध्द सुनेचा सामना रंगला आहे. बाणेगांव ग्रामपंचायत निवडणुकीत २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तीन पॅनेल आमने-सामने निवडणूक लढवित आहेत. परंतु, वाॅर्ड क्रमांक १ मध्ये चक्क सासू त्यारनबाई हुसेन शेख विरूध्द सादीयाबी शफीक शेख या रिंगणात उतरल्या आहेत.
टेंभुर्णीत बहिणीविरुध्द बहीण
टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका वाॅर्डात सख्ख्या बहिणी तर अन्य एका वार्डात नणंद- भावजय एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. येथील प्रभाग चारमध्ये सुमन म्हस्के व कमल साळवे या सख्या बहिणींंनी तर प्रभाग पाचमध्ये कमल साळवे या नणंदेने चक्क आपली भावजय असलेल्या दगडाबाई मघाडे यांनाच आव्हान दिले आहे.
तळणी गावात जाऊविरुध्द जाऊ
भोकरदन तालुक्यातील भायडी ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या तळणी गावात सख्ख्या भावांनी त्यांच्या बायका एकमेकींविरुध्द उभ्या केल्या आहेत. येथील लताबाई गायकेविरुध्द रेखाबाई गायके यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे कोणत्या सुनेला मतदान करावे, असा प्रश्न त्यांच्या सासू-सासऱ्यांना समोर पडला आहे. ही लढत रंगतदार होणार असल्याने ग्रामस्थांचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.