मंठा : अयोध्यातील श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानानिमित्त शहरात रविवारी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, दुतर्फा रांगोळी आणि श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या देखाव्याने मंठाकरांचे लक्ष वेधले.
मार्केट यार्डातील जागृत हनुमान मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा सुगंधानगर-बोराडे गल्ली- छत्रपती शिवाजी महाराज चौक-पोलीस ठाण्यामार्गे मुख्य रस्त्याने वाजत-गाजत निघालेल्या या शोभायात्रेचा समारोप जागृत हनुमान मंदिर येथे करण्यात आला. या शोभायात्रेत ‘श्री रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शोभा यात्रेदरम्यान महिलांनी श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचे औक्षण केले. रथामध्ये श्रीरामाची भव्य प्रतिमा, घोडेस्वार आणि भगवे झेंडे यामुळे शोभायात्रेची शोभा वाढली. जागृत हनुमान मंदिर येथे महाआरती करून पसायदानाने शोभायात्रेची सांगता करण्यात आली. या शोभायात्रेचे नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले होते. या शोभायात्रेत मंठा शहरासह ग्रामीण भागातून हजारो रामभक्त सहभागी झाले होते.