मंठा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार’ छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी राजेश्री कान्होजी नाईक जेधे यांचे १४ वे वंशज राजधीर जेधे (रा. कारी ता. भोर जि. पुणे) यांना जाहीर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व कान्होजी नाईक जेधे यांचा इतिहास लेखन व संशोधन करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक विलास सोनवणे (सातारा) यांना ‘शिवराज्य भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना ‘शिवसृष्टी प्रेरणा’ पुरस्कार देण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या साहित्यावर पीएच.डी. करणारे डॉ. एकनाथ शिंदे (जालना), कोरोना काळात भरीव कामगिरी बजावणारे डॉ. स्वप्नील मंत्री (परतूर), शिवाजी महाराजांवर काव्यलेखन करणारे कवी मित्र शेख शब्बीर (सिल्लोड), ‘रांमळ्याच्या वाटा’ या समाज माध्यमांवरील कवितेच्या सदरात विविधांगी कवितेचे सादरीकरण करणारी बालकवयित्री श्रावणी बरकुले (परतूर) यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मोरे परिवाराकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांचे वितरण १९ फेब्रुवारी रोजी आमदार बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक सहदेव मोरे, डॉ. कल्याण मोरे यांनी दिली.