जालना : महाराजा अग्रसेन फाउंडेशनच्यावतीने व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांची तज्ज्ञ समितीमार्फत निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती अग्रसेन फाउंडेशनचे प्रमुख डॉ. रामलाल अग्रवाल यांनी दिली.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करून शकणार आहेत. तज्ज्ञ समितीमार्फत जिल्ह्यातील रहिवासी, आर्थिक दुर्बलता, गुणवत्ता या निकषांद्वारे दहा विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. एकूण अडीच लाख रुपये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक फीस लक्षात घेऊन विभागातून दिली जाणार आहे. यावेळी निवड समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. शिवाजी मदन, डॉ. संजीवनी तडेगावकर, प्रा. संदीप पाटील, डॉ. प्रतिभा श्रीपत आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, असे आवाहनही डॉ. अग्रवाल यांनी केले आहे.