सोमवारी सकाळी या पथकातील अधिकाऱ्यांचा ताफा औरंगाबादहून निघून बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे पोहोचला. तेथील शेतीसह रस्त्यांची पाहणी पथकाने केली. या भागातही मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले. या पथकाने तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे ज्या रोशनगाव येथे अतिवृष्टीत एका रात्री २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्या गावालाही पथकाने भेट दिली. सकाळी आठ वाजेपासून हा त्यांचा दौरा सुरू होता.
चौकट
द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
जालना तालुक्यातील कडवंची आणि नंदापूर येथे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागा आहेत. तसेच या भागातील धारकल्याण, पीरकल्याण, न्हावा आदी गावांमध्ये आता डाळिंबाच्या बागाही फुलल्या आहेत. त्यामुळे यंदा द्राक्षांना लागेल्या घडांचे प्रमाण हे नगण्य आहे. त्यामुळे यंदा किमान तीन ते चार लाख रुपयांचा फटका बसणार असल्याची माहिती प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले.
चौकट
केंद्र सरकारने नुकसानभरपाई तातडीने द्यावी, यासाठी यात आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. यावेळी त्यांनी पथकाला सांगितले की, फळबागांसह कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा पाऊस पडूनही शेतकरी अडचणीत असल्याने त्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली. तसेच आपण केंद्रातील कृषिमंत्र्यांसह कृषी सचिवांना बोलून मदत मिळवून देऊ, असे आश्वासन आ. गोरंट्याल यांनी दिले.
चौकट
शेतमालाच्या आवकीवर परिणाम
प्रारंभी चांगला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदित होता; परंतु ऐन काढणीला पिके आल्यावर अतिवृष्टीने आणि परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मदत केलीच आहे; परंतु केंद्राने आता या पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यावर ती मदत तातडीने करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री तसेच केंद्राकडे करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ. खरीप हंगामात बाजार समितीत येणाऱ्या कृषी मालाची आवक जवळपास ४० टक्के कमी झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी सांगितले.